जिरेमाळी समाज सेवा संघ, महाराष्ट्रजिरेमाळी समाज हा फार पुरातन काळापासुन अस्तित्वात असल्याचे मानले जाते. राजा भगिरथ व राजा सगर यांचे वंशज आपण स्वत:ला समजतो. इतक्या पुरातन काळापासुन आपला हा समाज अस्तित्वात असला तरी तो कधीच संघटीत असल्याचे दिसुन येत नाही. देशात अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आजही जिरेमाळी समाज मोठया प्रमाणावर वास्तव्यास आहे. अनेक गावांची नावे देखील आपणांस आजही माहीत नाही. राज्यात नागपुर पासुन अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, जालना, औंरगाबाद, जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक, या जिल्ह्यातील अनेक गांवामध्ये आपला समाज एकवटलेला आहे. या सर्वांना एकत्र आणुन एकसंघ समाज निर्माण करणे आवश्यक होते. दुर्दैवाने या पुर्वीच्या काळात तसे ठोस प्रयत्न झाल्याचे दिसुन येत नाहीत. तुरळक ठिकाणी समाज मेळावे घेण्यात आल्याचे दिसून येते. काही गावांत, जिल्ह्यामध्ये पुर्वी व आताही समाज मंडळे आहेत. प्रत्येक संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रात समाजोपयोगी कार्यक्रम करीत असतात. मात्र मर्यादित कार्यकक्षेमुळे सर्व समाज बांधवांना एकत्र आणणे शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

या पार्श्वभुमीवर, सन १९९८ मध्ये मुंबई व ठाणे जिल्हयातील समाज बांधवांना एकत्र आणण्याच्या दॄष्टीने सगरवंशीय जिरेमाळी समाज मंडळ नावाची संस्था स्थापन झाली. या संस्थेच्या प्रेरणेतुन प्रथम मुंबईत राज्यव्यापी मेळावे घेण्यात आले. त्यातुनच रज्यभरातील समाज बांधवांना एकत्र करण्याची प्रेरणा मिळाली व दिनांक २६ जुलै २००७ रोजी राज्यास्तरीय जिरेमाळी समाज सेवा संघाची अधिकृतरित्या मुंबई येथे स्थापना करण्यात आपण यशस्वी झालो.

आजमितीस आपल्या या राज्यव्यापी संस्थेच्या १६ जिल्हा शाखा, १६ तालुका शाखा व २६ ग्रामपातळीवरील शाखा आपण निर्माण केलेल्या आहेत. अनेक उपक्रम आपण या संस्थेच्या अधिपत्याखाली सुरु केलेले आहेत. नोव्हेंबर २००८ पासुन जिरेमाळी समाजाचे राज्यस्तरावरील मुखपत्र म्हणुन जिरेभुषणची सुरुवात आपण केलेली आहे. आतापर्यंत जिरेभुषणचे १० अंक प्रकाशित करण्यात आले आहेत. राज्यभरातील जवळपास ४०० पेक्षा अधिक बांधव मुखपत्राचे आजीव सभासद झालेले आहेत. जिरेभुषणच्या सातत्यपुर्ण प्रकाशनासाठी लवकरात लवकर १००० आजीव सभासद आपणांस करावयाचे आहेत. सन २०१० पासुन राज्यातील अनेक समाज बांधवांच्या जाहिरातीच्या माध्यमातुन जिरेभुषण दिनदर्शिका आपण प्रकाशीत करीत आहोत. सन २०११ वर्षापासुन http://www.jiremalisamaj.com हे समाजाचे स्वत:चे संकेतस्थळ श्री.प्रशांत व मिनल सोनवणे यांच्या सहकार्याने आपण सुरु केलेले आहे. याद्वारे समाजातील घडामोडींची माहीती, नोकरीविषयक जाहिराती आपण विद्यार्थ्यांना व समाज बांधवांना पुरवू शकतो. या संकेतस्थळावर ऑगष्ट २०१२ पासुन वधु-वरांची माहिती मॅट्रीमोनियल द्वारे पुर्ण जगभर सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

समाजाची म्हणजेच आपल्या सर्वांची ही वेबसाईट(संकेतस्थळ) जास्तीत जास्त चांगल्या रितीने डेव्हलप करण्यासाठी समाजातील इतर इच्छुक समाजबांधवांनी श्री. प्रशांत सोनवणे यांना मदत करुन समाजकार्यातील आपला हिस्सा उचलावा, असे या निमित्ताने आवाहन करीत आहोत.

आजपर्यंत राज्यातील असंख्य समाज बांधवांना मुंबई व मुंबई बाहेरील शासकीय/निमशासकीय रुग्णालयांमध्ये वैयक्तिक तसेच संस्थेच्या माध्यमातुन रुग्ण सेवा पुरविण्याचे कार्य आपण करीत आहोत. दि. १ जुन २०१२ रोजी रोजी पिशोर, ता. कन्नड, जि. औंरगाबाद या ठिकाणी जिरेमाळी समाज सेवा संघातर्फे डोळ्याचे मोफत तपासणी शिबीर आयोजित करुन पदमश्री डॉ. तात्यारावजी लहाने यांच्या आशिर्वादाने ११०० रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. संस्थेच्या माध्यमातुन दि. २३.०६.२०१२ प्रथम ९० रुग्णांवर व त्यानंतर २६ ऑगष्ट २०१२ रोजी ३० रुग्णांवर सर ज. जी. समुह रुग्णालयात मोफत यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. गरिबीमुळे या रुग्णांपैकी अनेक अंधकारमय जिवन जगणार होते परंतु संस्थेच्या प्रयत्नातुन करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे जिवन प्रकाशमय झाले. संस्थेच्या माध्यमातुन करण्यात आलेले हे एक महान सामाजिक कार्य असुन इतिहासात त्याची निश्तितच नोंद होईल यात शंका नाही.

संस्थेने सन २०१२ पासुन सर्व जिल्हयांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण-गौरव सोहळा आयोजित करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार मुंबई-ठणे, नाशिक-१, नाशिक-२, धुळे, खामगांव-अकोला, वाशिम या जिल्हयांमध्ये संस्थेतर्फे गुणगौरव सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातुन अनेक जिल्हा, तालुका व ग्रामशाखांची निर्मिती झाली. एकमेकांविषयींचे मतभेद, द्वेष, मत्सर विसरुन सर्व समाजबांधवांना एकत्र आणुन अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थेमार्फत आपणास राबवावयाचे आहेत. गरज आहे ती आपल्या सामाजिक, आर्थिक व सक्रिय सहकार्याची.

आपल्या सकारात्मक प्रतिसादच्या अपेक्षेत.

नारायण नवले
संस्थापक व सरचिटणीस
जिरेमाळी समाज सेवा संघ

More Website Templates at TemplateMonster.com!
2012 Copy Right Jiremalisamaj.